सोलापूर - शहरासह 30 गावांमध्ये दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांना घरात बसा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, काही नागरिक या लॉकडाऊनचे उल्लंघन करताना दिसत आहेत. पोलीस मात्र या बेशिस्त नागरिकांना काठ्याचा महाप्रसाद देत आहेत. तसेच गल्ली बोळात जाऊन लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये शहर पोलीस दलाच्यावतीने 2 हजार 500 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आहे. 12 एप्रिलपासून आजतागायत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जवळपास 5 हजारांच्या पुढे रुग्ण संख्या गेली आहे. झोपडपट्टी भागातून शिरकाव करून कोविड-19 विषाणूने आता उच्चभ्रू सोसायटीमध्ये थैमान मांडले आहे. ही साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोधी गल्ली, शास्त्री नगर, मौलाली चौक, कुंमठा नाका, भोजपा टेकडी, बाशा पेठ, बेगम पेठ, विजापूर वेस, रामवाडी, सलगर वस्ती, भूषण नगर, लिमयेवाडी, बुधवार पेठ, शहराच्या आदी भागात पोलीस बिट मार्शल दुचाकी वाहनांवर जाऊन बेशिस्त नागरिकांना काठ्यांचा प्रसाद देत आहेत. तर काही ठिकाणी या बेशिस्त व हुल्लडबाजी करणाऱ्यांना उठाबश्यांची शिक्षा देण्यात येत आहे.
शहरातील सात रस्ता, रंग भवन, कोतम चौक, एसटी स्टँड परिसर, आसरा चौक, गुरुनानक चौक, अशोक चौक आदी मुख्य चौकात अत्यावश्यक कामासाठी आलेल्यांना देखील मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा अशी विनंती करत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेच लागणार आहे.