सोलापूर- कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत पहिले ते चौथीचे वर्ग बंदच आहेत. राज्यशासनाने ऑनलाइन माध्यमातून शाळा सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षकांना दिले होते. मात्र ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, हळूहळू शाळा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली, मात्र अद्यापही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंदच आहेत. या वर्गातील विद्यार्थी मोबाइल, लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे घेत आहेत.
घराघरात भरल्या ऑनलाइन शाळा
मार्च महिन्यापासून भारतामध्ये लॉकडाऊन सुरू झाले होते, लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सरकारने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घ्यावेत असे आदेश शिक्षकांना दिले होते. वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला, मात्र पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्याचे समोर आले. अनेक ठिकाणी घरात ऑनलाईन शाळ भरल्याचे पाहायला मिळाले.
ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन खरेदी कसे करायचे?
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. घरातून बाहेर पडता येत नसल्याने, अनेक जण आर्थिक विवंचनेत सापडले. त्यातच मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन खरेदी कारावे लागणार असल्याने, त्यासाठी पैसे कसे आणायचे असा प्रश्न पालकांना पडला. काही पालकांनी यातून मार्ग काढत, सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून ऑनलाईन वर्ग सुरू केले. मात्र ग्रामीन भागात मोबाईलला न मिळणारे नेटवर्क, तसेच पालकांमध्ये असलेल्या आडाणीपणा हा या शिक्षण पद्धतीमधील अडसर ठरला.
पालकांनी बजावली दुहेरी भूमिका
ऑफलाईन वर्ग किंवा प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीमध्ये पालक आपल्या पाल्याची सर्व जबाबदारी शिक्षकांवर सोपवून मोकळे होत होते, मात्र ऑनलाई शिक्षण पद्धतीमध्ये त्याला मर्यादा आल्याने, पालकांनाच शिक्षकांची देखील भूमिका बजावी लागली. त्यामुळे एकाच वेळी पालक आणि शिक्षक अशा दुहेरी भूमिकांमधून पालकांना जावे लागले.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद झालाच नाही
ऑनलाइन क्लासेसमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारा संवाद चुकला. विद्यार्थ्यांमध्ये जी शिक्षकांबद्दल जी भीती होती, ती ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे कमी झाली. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी होती, मात्र अनेक विद्यार्थी आपल्या पालकांकडून गृहपाठ करून घेत असल्याचे समोर आले.
चित्रात्मक माहितीच्या आधारे शिक्षण
सोशल उर्दू प्रायमरी शाळेच्या प्राचार्यां असिफ इकबाल यांनी चित्रात्मक पद्धतीने या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी सूचना केली आहे. ज्याप्रमाणे प्राचीन काळात सिंधू संस्कृती मध्ये कोणतीही लिपी अस्तित्वात नसताना त्यावेळी चित्रात्मक लिपी अस्तित्वात होती. त्याच पद्धतीला ऑनलाइन क्लासेसमध्ये महत्त्व आले आहे. या पद्धतीचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.