सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कन्ना चौकातील हिंगलाजा बॉईज या इमारतीमध्ये 50 बेडचे कोविड हेल्थ सेंटर 25 दिवसांत सुरू करण्यात आले. शनिवारी या कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, महापौर श्रीकांचना यंनम आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बोलताना सांगितले की, अतिशय कमी वेळात आणि कमी खर्चात 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन व्यवस्था, 8 डॉक्टर व त्यांची टीम कार्यरत आहेत.
महापौर कांचना यन्नम यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलचे काम आयुक्तांनी अतिशय कमी वेळात व कमी खर्चात केले आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये याची विशेष काळजी घेतली आहे.
आमदार प्रणिती शिंदे या आपल्या मनोगतात मत व्यक्त करताना म्हणाल्या की, सोलापूर महानगरपालिकेने फक्त 25 दिवसांत 50 बेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केले, ही बाब अभिमानस्पद आहे.
याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. विरु दूधभाते, डॉ. वैशाली शिरशेट्टी, डॉ. लता पाटील, डॉ. मुलाणी, डॉ. चौगुले, डॉ. बिराजदार, डॉ. कौस्तुभ, मेट्रन रजपूत, विभागीय अधिकारी सुनील लामकाने, नगर सचिव प्रवीण दंतकाळे आदी वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता.