सोलापूर - सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तासाठी सोलापूर जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था संघटनानी आप आपल्या परीने मदत रवाना केली आहे. खाद्यपदार्थ,चादरी यासह उपयोगी साहित्य सांगलीकडे रवाना झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील पूर ओसरल्यानंतर तत्काळ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालूक्यातील दहा पिण्याच्या पाण्याचे टँकर सांगलीच्या दिशेने रवाना करण्यात आले आहेत. त्यासोबतच पंढरपूर देवस्थान समितीच्या वतीने एक ट्रक लाडू पाठवण्यात आले आहेत.
करमाळा तालुक्यातून तांदूळ, डाळ, तेल व मसाला हे खाद्य पदार्थ पाठवण्यात आले आहेत. सोबत स्वयंपाक करण्यासाठी आचारी देखील सांगलीला पाठविण्यात आले आहेत. सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने 33 पोते तांदूळ, 10 पोते मूगदाळ, 20 बॉक्स बिस्किटे, तेल मसाला आदी साहित्य असलेला टेम्पो जिल्हाधिकारी कार्यालयातून शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आले आहे.
सोलापूर शहर व जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने शेंगदाणा चटणी, कडक भाकरी पाठवण्यात आल्या आहेत. शनिवारी दिवसभरात अनेक सामाजिक संस्था आणि संघटना या मदतीचे साहित्य पाठवणार आहेत.