सोलापूर - उजनी धरणातून तब्बल 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला जाणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बनवाबनवी करून सोलापूरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची बनवाबनवी उघडी पडली आहे. त्यामुळे सोलापूरकरांचा रोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांना सोलापुरात येऊ न देण्याचा इशारा दिला आहे.
उजनीच्या पाणी प्रश्नावरून सोलापुरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी वाद सुरू झाला आहे. पालकमंत्र्यांनी सोलापूरकरांच्या नादी लागू नये, अन्यथा सोलापुरात येऊ देणार नाही, असा इशाराच काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिला आहे. अनेक वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांची सेवा करणारे नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्याही अपमानाबद्दल प्रकाश वाले यांनी संताप व्यक्त केला.
सोलापूरकरांच्या नादी लागू नका अन्यथा -
प्रकाशवाले यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक बाबा मिस्त्री, गटनेते चेतन नरोटे, अंबादास करगुळे, युवराज जाधव हे उपस्थित होते. पालकमंत्री भरणे यांच्यावर संताप व्यक्त करण्यात आला. मामा आमच्या नादी लागू नका, अन्यथा सोलापूरात प्रवेश बंद करू असा इशारा शहर काँग्रेसने दिला.