सोलापूर - अक्कलकोट रस्त्यावरील गोदूताई परुळेकर वसाहतीत जवळपास 60 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या वास्त्यव्यास आहे. या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत होता. अखेर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपाययोजनांमुळे व प्रयत्नाने सध्या बाधितांची संख्या शून्यावर आलीय.
गोदूताई परुळेकर वसाहतीत मोठ्या संख्येने कामगार वास्तव्यास आहेत. या ठिकाणी 28 मे रोजी पहिला रुग्ण आढळला; आणि त्यानंतर ही संख्या थेट 45 पर्यंत पोहोचली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
याठिकाणी जवळपास 200 स्वयंसेवक नेमले. लोकांना घराबाहेर पडण्यास सक्तमनाई केली. ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आली. अनावश्यक बाहेर पडलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले. यामुळे नागरिक एकमेकांच्या संपर्कात येण्यास मज्जाव बसला. अखेर महामारीची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले. सर्व रुग्ण उपचार घरी परतल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली. पोलीस आरोग्य यंत्रणा व नागरिक यांच्या समन्वयातून हे साध्य झाले. 20 जून नंतर या परिसरात एकही रुग्ण आढळला नाही.
मुळेगाव पारधी वस्ती येथे देखील एकाच दिवसात 236 स्वॅबचे नमुने घेण्यात आले. ग्रामीण पोलिसांनी पारधी वस्तीला वेढा घातला होता. प्रबोधन, सॅनिटायझींग,तपासण्या, आदींमुळे हा आकडा कमी करण्यात यश मिळाले आहे.