सोलापूर- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 984 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 1 हजार 438 कोटी रूपयाचे कर्ज वाटप
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी 68 टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामात 1 हजार 438 कोटी 52 लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 984 कोटी 15 लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 66 हजार 151 खातेदारांना हे पीककर्ज वाटप करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
सरासरीहून जास्त पावसाची नोंद-
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 1 जून ते 3 ऑगस्टपर्यंत 325 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. जून ते जुलैच्या महिन्यात जिल्ह्यात सरासरी पाऊस हा 220 मिलिमिटर असतो. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये 3 लाख 59 हजार 294 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चांगल्या पावसामुळे सरासरीच्या 153 टक्के पेरणी झाली आहे.
सर्वाधिक बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरला पीकविमा
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत 2 लाख 68 हजार 542 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण संरक्षित रक्कम 501.82 कोटी रुपये आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा 10.27 कोटी रुपयांचा आहे. सर्वात जास्त बार्शी तालुक्यातील 1 लाख 18 हजार 318 शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.