सोलापूर - जिल्ह्यातील 590 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल हाती लागला असून या निवडणुकीत सत्ताधाऱ्यासह प्रस्थापितांना धक्का बसला आहे. पंढरपूर, माळशिरस, बार्शी, दक्षिण सोलापुरात भाजप, अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस, माढामध्ये राष्ट्रवादी, उत्तर सोलापूरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले. सांगोला तालुक्यात शेकापचे वर्चस्व दिसून आले. एकंदरीत ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व दिसून आले.
दक्षिण सोलापूरमध्ये माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गड राखला. तर पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये परिचारक गटाला संधी मिळाली आहे. बार्शी तालुक्यात राजेंद्र राऊत यांचे पॅनल विजयी झाले आहे. मोहोळमध्ये राष्ट्रवादीने मुसंडी मारत राजन पाटील गटाने बाजी मारली आहे. माळशिरस, अकलूज, ग्रामपंचायतीमध्ये मोहिते पाटील यांनी गड राखला आहे. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.
ठळक घडामोडी -
1) दक्षिण सोलापूर तालुक्यातील 54 ग्रामपंचायती पैकी 8 बिनविरोध झाल्या तर उर्वरित ग्राम पंचायतीमध्ये भाजपची सत्ता आली.
2) दक्षिण सोलापूरमधील ग्रामपंचायत निवडणूकमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय चिडानंद सुरवसे, माजी आमदार दिलीप माने, यांचे निकटवर्तीय प्रमोद शिंदे यांचा पराभव झाला आहे.
3) माजी मंत्री दिवंगत आनंदराव देवकते यांचे नातू सतीश देवकते यांचा विजय झाला आहे.
4) मोहोळ तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीमध्ये 71 ग्राम पंचायतीत राष्ट्रवादी राजन पाटील गटाने विजय मिळवला आहे.
5) पंढरपूर तालुक्यात 72 पैकी 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये परिचारक व भालके गटाचे वर्चस्व दिसून आले.
6) माळशिरस तालुक्यातील 44 हून आधिक ग्रामपंचायतीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील गटाने वर्चस्व स्थापन केले आहे. मात्र संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.
7) धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने 3 ग्राम पंचायतीवर झेंडा रोवला आहे.
8) सांगोला तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीमध्ये 5 बिनविरोध झाल्या. उर्वरित 56 पैकी 30 ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे पॅनल निवडून आले आहे.
9) बार्शी तालुक्यात 80 ग्रामपंचायत पैकी सर्वात जास्त राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
10) अक्कलकोट तालुक्यात भाजप व काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
11) माढा तालुक्यात एक हाती सत्ता अण्णा ढाणे यांच्या गटाच्या हाती आली आहे. माढा तालुक्यातील अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचा दारुण परभव झाला आहे.
12) मंगळवेढा तालुक्यातील गावात अवताडे गटाने विजयाचा झेंडा रोवला आहे. 12 ग्रामपंचायतीवर त्यांनी एक हाती सत्ता प्राप्त केली आहे.
13) अक्कलकोट तालुक्यातील आमदार कल्याणशेट्टी गटाचा दारुण पराभव झाला आहे. तर सिद्धाराम म्हेत्रे गटाने विजय प्राप्त केला आहे.