सोलापूर - शहरात बेफामपणे वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांना आता लगाम बसणार आहे. शहर वाहतूक शाखेत आता वाहनांचा वेग तपासण्यासाठी इंटरसेप्टर कार दाखल झाली आहे. अगोदर ही कार फक्त महामार्ग वाहतूक पोलिसांकडे होती. आता मात्र, सोलापूर शहर वाहतूक शाखेतदेखील अशी कार दाखल झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपाली धाटे यांनी दिली.
बाईक रायडर व रेसर्सवर लागणार लगाम -
शहरातील अनेक टवाळखोर बेफामपणे दुचाकी वाहने आणि चार चाकी वाहने चालवतात. इंटरसेप्टर कारमुळे यांना आता लगाम लागणार आहे. अनेक अपघातांना आमंत्रण देणाऱ्या टवाळखोरांना आता शहरात वाहने चालवताना मर्यादेत राहून चालवावी लागणार आहेत.
शहरातील जीवघेणे अपघात होतील कमी -
शहरात होणारे जीवघेणे अपघात आता कमी होतील, अशी माहिती दीपाली धाटे यांनी इंटरसेप्टर कारच्या उद्घाटनावेळी दिली. बेफामपणे चालणाऱ्या वाहन चालवणाऱ्यांमुळे शहरात अनेक अपघातात होतात. यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहने चालवावे लागणार -
शहराच्या विविध चौकात ही इंटरसेप्टर कार घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस वाहनांचे वेग मोजणार आहेत. वाहन धारकांना दिलेल्या नियमांतच वाहनांचा वेग ठेवावा लागेल. शहरात वाहनधारकांना आता 30 ते 40 किमी प्रति तास या वेगाने वाहने चालवावी लागणार आहेत.