सोलापूर - अनेकवेळा भीमा व सीना नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा विरोधात तक्रार देऊनही महसूल प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करत आहे. वाळू माफियांवर त्वरित कारवाई व्हावी, ही मागणी करत मोहोळ शहर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आष्टा गावाजळील सीना नदी पात्रात प्रतिकात्मक जलसमाधी घेत आंदोलन केले.
तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनाचे वाळू माफियांत लागेबांध
मोहोळ शहर शिवसेना प्रमुख विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सीना नदीत प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन झाले. तहसील व पोलीस प्रशासनाचे वाळू माफियांत लागेबांध असल्याने बिनधास्तपणे माफियांनी आपला अवैध व्यवसाय सुरू ठेवला आहे. वाळू वाहतूक रोखत कारवाई केली नाही तर येत्या काळात मोठे जन आंदोलन उभे करू, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सीना नदीतून वाळू उपसा करू नये, असे पर्यावरण विभागाने आदेश काढला आहे. तरीही वाळू माफियांचा वाळू उपसा सुरूच आहे. नदीमधून अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाईपलाईनची व्यवस्था केली आहे. पण, या वाळू उपसामुळे नदीतील पाणी पातळी कमी होत चालली आहे. याचा परिणाम शेतीवर होत असल्याची तक्रार अनेक शेतकरी करत होते.
महसूल विभागाचे दुर्लक्षच
सीना नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असताना महसूल विभागातील कर्मचारी वाळू माफियांकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचेही शिवसैनिकांनी सांगितले.
पोलिसांनी स्वीकारले निवेदन
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सीना नदी पात्रात तब्बल 4 तास पाण्यात प्रतिकात्मक जलसमाधी घेत वाळू उपसा विरोधात आंदोलन केले. मात्र, महसूल प्रशासनाचा कोणताही अधिकारी यावेळी नदीजवळ फिरकला नाही. शेवटी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून निवेदन स्वीकारले.
हेही वाचा - सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील अतिक्रमणे जमीनदोस्त; प्रशासनाची 'धडक'
हेही वाचा - दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा