सोलापूर- बार्शीतील महिला बचत गटांकडे कर्जाच्या वसूलीसाठी फिरणाऱ्या फायनान्स अधिकारी आणि कर्मचाऱ्याची गाढवावरून धिंड काढण्यात येणार होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वसूली करणारा अधिकारी आणि कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची नाचक्की टळली.
वसूलीसाठी फिरणाऱ्या या फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत वसूली करू नये, असे सांगितल्यानंतर देखील पैशांसाठी तगादा लावत होते. या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. यानंतर त्यांची धिंड काढण्याच्या हेतूने गाढवं आणण्यात आली. मात्र वेळीच बार्शी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा प्रकार थांबला.
बार्शीत भारत फायनान्सचे अधिकारी महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या वसूलीसाठी फिरत होते. फायनान्सचे अधिकारी महिलांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सक्ती करत असल्याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांनी पकडले; आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढण्याची तयारी केली. धिंड काढण्यासाठी आणलेल्या गाढवांना हार घालण्यात आले. मात्र बार्शी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन हा प्रकार थांबवला. अखेर भारत फायनान्सचे अधिकारी आणि कर्मचारी यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. याचा महिला बचत गटांना देखील मोठा फटका बसलाय. मात्र बार्शीतील फायनान्सकडून महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या वसूलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. फायनान्स कंपन्यांनी महिला बचत गटाकडून कोणतीही वसूली करू नये, असे सांगितले आहे. 10 जून रोजी बार्शी शहरातच शिवसेनेच्या वतीने एका फायनान्स कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत कोणत्याही बॅंकेने तसेच फायनान्स कंपनीने कर्जाची वसूली करू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते.