सोलापूर -देशाची सूत्रं अपघाताने नरेंद्र मोदींच्या हातात गेली आणि देशाला त्यांनी पाच वर्षातकुठे नेऊन ठेवले हे न बोललेले बरे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर टीकेची झोड उठविली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी दमाणी नगरातील दमाणी लॉन्स येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव तसेच मनमोहनसिंगांपर्यंत काँग्रेसच्या विचाराने देश चालविण्याची गरज असणाऱ्यांनी देशाची उंची आंतरराष्ट्रीय पातळीवर एका विशिष्ट लेव्हलला नेऊन ठेवली आणि देशाचा चेहरा- मोहरा बदलून टाकला. त्याविरुद्ध पाच वर्षांपूर्वी एखादा अपघात झाला आणि त्याचे परिणाम आपण सर्वजण बघत आहोत. त्यामुळे राष्ट्रपातळीवर आणि सोलापूरच्या पातळीवर बदल हवा आहे. जे नाणे खणखणीत वाजणारे आहे, चालणारे आहे, त्या नाण्याचा स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्यादृष्टीने सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी मोलाची असल्याचेही सांगतसोलापूर शहर हे गांधी आणि नेहरूंच्या विचारांना पाठिंबा वशक्ती देणारे शहर आहे. त्याची पुनरावृत्ती होण्यासाठी शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहनही पवार यांनीकेले.
राज्य व देशात कौतुकाची झलक राज्याला दाखवून देणाऱ्या व्यक्तिसाठी काम करण्याची संधी काँग्रेसने आपणास दिली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेची ही निवडणूक महत्त्वाची आहे. गांधी व नेहरूंच्या विचारांना जे शहर पाठिंबा देते त्या शहरामध्ये पाच वर्षांपूर्वी अपघात कसा झाला? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासामध्ये ज्यांनी लक्ष दिले, ज्याने राज्य व देशाचे नेतृत्व केले, अशा व्यक्तीला सोलापूरकरांनी बाजूला ठेवल्याबद्दल पवार यांनी खंत व्यक्त केली.
सोलापूरमध्ये शिंदे यांच्या विरोधात लढणारी व्यक्ती माहीत नाही. नाव ऐकले वेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती आहे.तसे तर लोकशाहीत कुणीही निवडणुकीत उभे राहू शकतो. लोकांनी संधी दिल्यास त्या संधीचे सोने करण्यासाठीदृष्टी आणि विचारांची ताकद या दोन गोष्टींची गरज असते. ती स्थिती पाहिली तेव्हा असे दिसते कि, एका बाजूला ज्यांनी देश व राज्याचा उत्तम कारभार केला, संपूर्ण देशाने ऐकले असे व्यक्तिमत्व आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासन, विकास व लोकांचे प्रश्न याची इतंभूत माहिती खात्रीशीर नसलेले असे चित्रबघायला मिळतआहे. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्यम्हणून सर्वांनी शिंदे यांच्या विजयासाठी घरोघरी जाऊन मतदारांना बाहेर काढले पाहिजे. यामध्ये चिकाटी न ठेवल्यास त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा पवार यांनी यावेळी बोलताना दिला.
एकदा निवडून आलेला उमेदवार बदलत नाहीत
सोलापूर लोकसभेचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांची उमेदवारी कापून भाजपने जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना उमेदवारी दिली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ज्या राजकीय पक्षाने त्यांना संधी दिली होती, त्यांना बदलण्याची भूमिका पक्षाने घेतली. साधारणपणे राजकीय पक्ष एकदा निवडून आल्यानंतर त्यांना कधी बदलत नसतो. सोलापुरात बदल केलेला दिसतो. सत्ताधाऱ्यांना अनुभव आल्यामुळेच उमेदवार बदलावा लागला असेल, असे सांगत पवार यांनी भाजपच्या कारभाराची चिरफाड केली.
जातीय शक्तीला सोलापूरकर वाव देणार नाहीत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे लोकांच्या व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहे. कृषिमंत्री असताना शरद पवारांनी तांदूळ आणि गहू याचे उत्पादन वाढविण्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. परिणामी तांदूळ निर्यात करता आला. आज मात्र वाईट परिस्थिती आहे तांदूळ आणि गहू आयात करावे लागत आहे. देश सर्वधर्माचा व्हायला हवा यासाठी त्यांनी भूमिका घेतली. सोलापुरात एमआयएम आणि सेक्युलॅरिज्म एकत्र जाऊ शकत नाहीत. जातीय शक्तीला सोलापूरकरांनी कधीही वाव दिला नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.