सोलापूर - देशाच्या सुरक्षेच्या विषयाचं भाजपकडून राजकारण केलं जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीच अनुपस्थित होते. तसेच भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही या बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पवार माढा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माढ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशाच्या सुरक्षेवरुन भाजपवर निशाणा साधला. सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात विचारल्यावर, यापूर्वीच्या सरकारनेही पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केले होते, परंतु त्याचा गवगवा करण्यात आला नव्हता. पण आत्ताच्या भाजप सरकारने राष्ट्राच्या सुरक्षा संदर्भातल्या या महत्वाच्या विषयाचे राजकारण करायला सुरुवात केली आहे. जे या देशांत यापूर्वी घडलं नसल्याचे पवार म्हणाले.
शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत कलह मिटवण्यासाठी खुद्द शरद पवारांनाच मैदानात उतरावे लागले आहे.