सोलापूर - उजनी धरणात 2 लाख क्यूसेक इतक्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे उजनी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून 40 हजार क्यूसेकने पाणी भीमा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पावसाची आवक ही 2 लाख क्यूसेक वेगाने होत आहे. पाण्याची आवक पाहता उजनी धरणाचे सात दरवाजे उघडले गेले असून धरणातून 40 हजार क्यूसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे.
धरणामध्ये सोमवारी दूपारपर्यंत 100 टीएमसी इतका पाणीसाठा
उजनी धरणामध्ये सोमवारी दूपारपर्यंत 100 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. उजनीच्या कार्यक्षेत्रात गेले तीन दिवस पाऊस थांबलेला नाही. पुणे जिल्हा आणि परिसरातील सर्व धरण शंभर टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक देखील 2 लाख क्यूसेक पर्यंत गेली आहे. धरण 80 टक्क्यापर्यंत लवकरच भरणार असल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे हे आवश्यक असल्याने पाणी सोडण्यात येत आहे.
उजनी धरणातून विद्युत प्रकल्प तसेच डावा कालवा आणि नदीत आणि भीमा - सीना जोड कालव्याला पाणी सोडण्याची प्रक्रिया काल रात्री पासून सुरू झाली आहे. तर दूसरीकडे नीरा नदीच्या खोऱ्यात देखील जोरदार पाऊस सुरू असून वीर धरणातून 80 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी दूथडी भरून वाहत आहे.