सोलापूर- करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस पिकाला पर्याय म्हणून उत्पादन घेण्यास सुरू केलेल्या केळी पिकाने साता समुद्रापार (आखाती देशात) भरारी घेतली आहे. उसाच्या गाळपासाठी शेतकऱ्याला दरवर्षी मनस्ताप सहन करावा लागतो. तो टाळण्यासाठी उजनी धरण पट्ट्यातील शेतकरी केळी पिकाकडे वळाले आहेत. वाशिंबे येथील शेतकरी सतीश बळीराम झोळ यांची केळी जागतिक बाजारपेठेत पोहचली आहे.
हेही वाचा- 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं' होर्डिंग लावले कशाला'
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्रातील वाशिंबे गावातील प्रगतशील शेतकरी सतीश बळीराम झोळ यांची केळीची शेती केली. त्यांच्या या केळीची निर्यात होऊन इराण, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, मलेशिया येथे सातासमुद्रापार पोचवली आहे. जैन टिश्यूकल्चर जी 9 जातीच्या केळीची पाच एकरात साडेसहा हजार रोपांची जोडवळ पद्धतीने त्यांनी लागवड केली आहे. आतापर्यंत 70 टन केळीचे उत्पादन झाले आहे. या केळीला 14 रुपये प्रति डझन इतका भाव मिळाला आहे.
केळीच्या लागवडीसाठी साधारण साडेचार लाख रुपये खर्च झाला असून दोनशे ते तीनशे टन माल (केळी) अजून निघेल, अशी आशा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. या भागातील युवा शेतकऱ्यांचा कल केळीच्या शेतीकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक ऊस शेतीला फाटा देऊन केळी पिकाच्या क्षेत्रात मात्र वरचेवर वाढच होत आहे. शेतकऱ्यांनी ऊसाला ब्रेक देऊन आपला मोर्चा केळी पिकाकडे वळवळा आहे. त्यातुन निर्यातक्षम केळी तयार करुन केळीची परदेशात विक्री केली जात आहे. ऊसापेक्षा जास्त पैसा केळी पिकापासून मिळू लागल्याने केळी पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.