सोलापूर - शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यामुळे सोलापूर शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन विमानसेवेत येणारे अडथळे दूर करत नाहीत. प्रशासनाकडून जाणून-बुजून कारवाई केली जात नाही, असा आरोप करत त्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा परिषद जवळील पूनम गेटवर धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - खळबळजनक..! पूर्व वैमनस्यातून पंढरपुरात माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या घालून हत्या
यावेळी संभाजी ब्रिगेडचे अजित शेटे आणि हनुमंत हुल्लोरी यांनी देशभक्तीपर गीत गाऊन अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. माननीय उच्च न्यायालयालयाच्या आदेशानुसार सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी सोलापुरातील विमानसेवा सुरू होण्यासाठी अडचण ठरत आहे. त्यामुळे 2 महिन्यापूर्वी या चिमणीचे पाडकाम करावे, असा आदेश नायालयाने दिला होता. मात्र, प्रशासन जाणून-बुजून कारवाई करत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाचा अवमान होत असून लवकरच संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी सांगितले.
सोलापुरातील उद्योग-व्यवसाय यांना फटका बसून अनेक सुशिक्षित युवक सोलापूर शहर सोडून पुणे मुंबई येथे स्थलांतरित होत आहेत. केंद्रशासनाच्या उडान योजनेअंतर्गत शिर्डी, औरंगाबाद येथील विमानसेवा सुरू झाली. मात्र, सोलापुरात विमान सेवा सुरू होण्यास अडथळा ठरणारी बेकायदेशीर चिमणी पाडून लवकरात लवकर विमानसेवा सुरू करावी. अन्यथा, यापुढे उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी सनी पाटु, महेश भंडारे, अजय कदम, संजय भोसले, किशोर कदम, शेरा शेख, सोमनाथ पात्रे, अभिजीत शिरके, अरविंद शेळके, संभाजी भोसले, अजित शेटे, सुरेश जगताप, रमेश लोखंडे, पिराजी दळवी, नामदेव राऊत, चेतन चौधरी आशुतोष माने, हनमंत हुल्लेरी उपस्थित होते.
हेही वाचा - पंढरीचा राजा सजला 'तिरंग्यात', प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक सजावट