सोलापूर - राज्य सरकारच्या किल्ले, गडकोट भाड्याने देण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने आसरा चौक येथे सरकारच्या विरोधात भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अठरापगड जाती धर्माच्या मावळ्यांच्या बलीदानाचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी दिला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - डॉ. कोल्हेंनी किल्ल्यातल्या बाभळी आधी काढाव्या -पर्यटनमंत्री रावळ
यावेळी शाम कदम म्हणाले, गड किल्ले महाराष्ट्राची अस्मिता आहेत. शिवाजी महाराज यांच्या चरण स्पर्श असलेला प्रत्येक किल्ला पवित्र आहे. आम्ही किल्ले भाड्याने देऊ देणार नाही गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेऊ पाहत आहे. संभाजी ब्रिगेड गड-किल्ल्यांचे हॉटेल कोणत्याही होऊ देणार नाही. सरकार धनदांडग्या उद्योगपतींसाठी इतिहास नामशेष करायला निघाले आहेत. त्यांना जर निधी कमी पडत असेल तर त्यांनी स्वतःचा बंगला, मंत्रालय, विधानभवन खुशाल भाड्याने द्यावे. किल्ले भाड्याने देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी त्वरित मागे घ्यावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडचे वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - गड किल्ल्यांवर हॉटेल आणि मॅरेज हॉल कदापि होऊ देणार नाही - खासदार छत्रपती संभाजीराजे
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके, सीताराम बाबर, आशुतोष माने, शफीक शेख यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.