सोलापूर - औरंगाबाद या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव संभाजीनगर असे करण्यात यावे, या मागणीसाठी सोलापुरात संभाजी आरमाराने निदर्शने करत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले. यावेळी संभाजी नगर या नावाला विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरोधातदेखील संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेसमधील विरोध करणाऱ्या नेत्यांनी स्वतःच्या अपत्यांची नावे औरंगजेब ठेवावी, असा टोलादेखील संभाजी आरमारच्या नेत्यांनी लगावला आहे.
धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कट्टर धर्मांध औरंगजेबाचे नाव कसे?
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या धर्मनिरपेक्ष राष्ट्रातील औरंगाबाद या शहराला औरंगजेब याचे नाव असणे म्हणजे संविधानाच्या उद्देशीकेशी विसंगती आहे. कट्टर धर्मांधतेची निशाणी असणाऱ्या औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी संभाजी आरमारने केली आहे.
महापुरुषांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारचा
राज्यातील जातीयवाचक वस्त्यांना असलेली नावे बदलून महापुरुषांचे नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मग राज्य सरकार कट्टर औरंगजेबाचे नाव असणारे औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजी नगर का करत नाही?
'बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करावे'
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील हेच स्वप्न होते.सध्या शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आहे. तर उद्धव ठाकरे हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करतील का?औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजी नगर करण्याचा सुवर्ण योग आहे. कारण राज्याची सत्ता शिवसेनेच्या हाती एकवटली आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर करून संभाजी राजेंचा एक प्रकारे सन्मान करण्यासारखा आहे.