सोलापूर - शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून इतर जिल्हा, राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे व बस स्थानकातच रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. याचे नियोजन सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांकडे 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना तपासणीचा अहवाल असेल किंवा ज्यांनी लस घेतली असेल अथवा एक महिन्यापूर्वी प्रतिजैवकांची केलेल्या तपासणीचा अहवाल असेल त्यांना शहरात सोडण्यात येणार आहे. मात्र, ज्यांच्याकडे हे काही नसेल त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. प्रवाशांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यास शहरात प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
प्रवाशांनी कोरोना तपासणी करूनच प्रवास करावा
मंगळवारी (दि. 30 मार्च) पालिका आयुक्तांनी रेल्वे व बसस्थानकातील चाचणी केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे व एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी पुढील उपययोजनांबाबत चर्चा केली व सूचना दिल्या आहे. मध्यवर्ती बसस्थानकात तीन ते चार पथके कोविड तपासणीसाठी नेमण्यात आली असून प्रवशांच्या संख्येनुसार पथके वाढविण्यात येणार असल्याचेही आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले. यावेळी त्यांनी प्रवाशांनी कोरोना तपासणी करुनच प्रवासाला सुरुवात करावी, असे आवाहनही केले आहे.
हेही वाचा - सोलापुरातील रुग्णालयात बेडची कमतरता नाही; सिव्हील सर्जन ढेले यांची माहिती