सोलापूर - ग्रामविकासाच्या प्रक्रियेतील प्रशासकीय दुवा असलेल्या ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी विठु माऊलींच्या जयघोषात पंढरीत दाखल झाली. या प्रबोधन दिंडीचे पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी स्वागत केले.
मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने ग्रामविकासाचा आणि स्वच्छतेचा संदेश देत नगर ते पंढरपूर अशी ही पायी दिंडी काढली जाते. यावर्षी या दिंडीत राज्यभरातील सुमारे २०० हून अधिक ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. नगर ते पंढरपूर दरम्यानच्या वारी मार्गावरील प्रत्येक गावात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून दिंडीने जलयुक्त शिवार, वृक्षलागवड, रोजगार हमी योजनांसह ग्रामविकास खात्याच्या विविध योजनांची माहिती आणि जनजागृती केली.
दिंडीत पायी आलेल्या ग्रामसेवकांनी विठ्ठलाकडे राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि ग्रामीण लोकांचे आरोग्य सुदृढ राहू दे, असे साकडे घातल्याचे ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष आणि दिंडी सोहळ्याचे प्रमुख एकनाथ ढाकणे यानी सांगितले. यानंतर दुपारी शितल साबळे यांच्या काल्याच्या किर्तनाने दिंडीची सांगता झाली.
दरम्यान, शासकीय विभागातील ग्रामसेवकांनी आषाढीची पायी प्रबोधन दिंडी सुरू केल्याने प्रशासकीय स्तरावर कौतुक केले जात आहे.