सोलापूर - शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. असा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही तत्पर आहोत, हा संदेश देत शुक्रवारी पोलिसांच्या वतीने सोलापूर शहरातील विविध चौकातुन रूट मार्च काढण्यात आला. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी शहरातून रूट मार्च केला.
सोलापूर शहर हद्दीत बकरी ईद आणि कोरोना विषाणू प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय आणि पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये विभागाअंतर्गत हा रूट मार्च शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान काढण्यात आला. सोलापूर शहरातील शानदार चौक, शास्त्री नगर, मौलाली चौक,लष्कर, विजापुर वेस, अशोक चौक, पाणी वेस, पंजरापोळ चौक, नई जिंदगी चौक, आसरा, होटगी रोड, विजापुर रोड, आदी भागांमधून हा रूट मार्च काढण्यात आला होता.

हेही वाचा - आणीबाणीतील बंदिवानांची पेन्शन अखेर बंद, ठाकरे सरकारचा निर्णय
रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मास्कचा वापर करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. रूट मार्च मध्ये पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त दरेकर, यांच्यासह ३३ अधिकारी व १८४ कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच पोलीस ठाण्याकडील मोबाईल, पी.सी.आर मोबाईल बीट मार्शल, सीसीटीव्ही वाहन, वज्र वाहन, महारक्षक वाहन व दंगा नियंत्रण वाहनांचा सहभाग होता.