सोलापूर - गावगाड्यातली जनता आणि जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या पोलीस पाटलांनी आज सोलापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरी पाटलांनी सरकारला इशारावजा घोषणाबाजी केली. यावेळी जिल्ह्यातील सर्व ११ महसुली तालुक्यातील पाटलांनी या मोर्चात सहभाग घेतला.
राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधन वाढीचा प्रश्न २०१२ पासून प्रलंबित आहे. तसेच २०१५ ला नागपुरात झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी २ महिन्यात मानधन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आतापर्यंत पोलीस पाटलांना वाढीव मानधन मिळाले नाही.
पूर्वी पाटीलकीवर मराठा, धनगर आणि लिंगायत या प्रमुख समाजाची मक्तेदारी होती. बागायतदार, श्रीमंत असेच पाटील असायचे त्यामुळे तत्कालीन पाटील पगार अथवा मानधन याचा विचार न करता प्रतिष्ठा म्हणून पाटीलकी करत होते. गेल्या काही वर्षात कायदा बदलला त्यामुळे पाटीलकी सर्वसमावेशक झाली. आता सर्वच समाजघटकतील लोकांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पाटील होता येते. मात्र, सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करताना होणारा खर्च विदयमान पाटलांना परवडत नाही. त्यामुळे त्यांना आंदोलने करावी लागत आहेत.
या आहेत पोलीस पाटलांच्या मागण्या-
- १) पोलीस पाटलांचं मानधन प्रतिमाह १५ हजार रुपये करा.
- २) पाटीलकीच्या वयाची मर्यादा ६० वरून ६५ करावी.
- ३) पोलीस पाटलांचे नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करा.
- ४) निवृत्तीनंतर १० लाखांचा निधी मिळावा.
- ५) पोलीस पाटलांना सरकारकडून विमा संरक्षण मिळावे.
- 6) पोलीस पाटलांना सरकारी कामात अडथळा संदर्भातील ३५३ गुन्हा दाखल करण्याचे आधिकार मिळावेत.