सोलापूर - उपमहापौर राजेश काळे यांना मदत करणं सांगवी पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. यात पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना कंट्रोलला सलग्न करण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे प्रथम दर्शी खाते अंतर्गत चौकशीत दोषी आढळले असून आणखी सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना अप्पर पोलीस आयुक्त पोकळे यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सांगवी पोलिसांनी एका फसवणुकीच्या गुन्ह्यात राहत्या ठिकाणहून सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली होती. परंतु, त्यांना सांगवी पोलीस चौकीत आताच शिंका आणि खोकला येत असल्याने वैद्यकीय तपासणी करून नोटीस बजावत सोडण्यात आल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे यांनी सांगितले होते. मात्र, सांगवी पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटत असल्याने याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार खाते अंतर्गत चौकशीत तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे दोघे ही दोषी आढळले असून त्यांच्यावर आयुक्त संदीप बिष्णोई यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.