बार्शी (सोलापूर) - पोलिसांना शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टारगेट देण्यात आले होते, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान आता असाच आरोप बार्शीमधील एका सराफा व्यवसायिकाने केला आहे. गृहमंत्र्यांच्या हप्ता वसुलीचे टारगेट पूर्ण करण्यासाठी पोलीस आपल्याकडे 5 लाखांची मागणी करत असल्याचा आरोप सराफा व्यवसायिक अमृतलाल गुगळे यांनी केला आहे. पोलिसांनी मात्र त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहरातील हळद गल्ली येथील चांदमल ज्वेलर्स हे सुरूच असल्याने पोलिसांनी दुकानावर कारवाई केली. या प्रकरणी दुकानाचे मालक अमृतलाल गुगळे यांच्याविरोध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यानंतर गुगळे यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत. दुकानावर कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी आपल्याकडे 5 लाखांची मागणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला पैशांचे हप्ते थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचावे लागतात, तुम्ही पैसे दिले नाहीत, तर तुम्हाला आम्ही विविध गुन्ह्यात अडकवू असेही पोलिसांनी म्हटल्याचा आरोप गुगळे यांनी केला आहे. गुगळे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केलेल्या या आरोंपामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आरोप फेटाळले
दरम्यान बार्शीचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. अमृतलाल गुगळे हे पूर्वग्रहदोषातून आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी गुगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच बेकायदा जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 15 दिवसांपूर्वीच त्यांच्या पुतण्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ते पूर्वग्रहदूषित होऊन आरोप करत असल्याने त्यांचे आरोप गांभीर्याने घेण्यासारखे नाहीत, असं गिरीगोसावी यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपचे व्हिडिओ व्हायरल
दोन दिवसांपूर्वी अमृतलाल गुगळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर, त्यांनी रविवारी पोलिसांनी कारवाई टाळण्यासाठी 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप केला. तसेच हप्ते थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचावे लागतात असं मला पोलिसांनी सांगितल्याचे ते म्हणाले होते. दरम्यान 15 दिवसांपूर्वी बेकायदा जमीन बळकवण्याच्या प्रकरणात त्यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने, ते असे आरोप करत असल्याचे स्पष्टीकरण पोलीस निरीक्षक गीरीगोसावी यांनी दिले आहे. या दोघांचेही व्हिडिओ सोशलमिडीयावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा - रेल्वेच्या पॉइंटमनने वाचवले चिमुकल्याचे प्राण; थरार सीसीटीव्हीत कैद