पंढरपूर (सोलापूर) - अवैधरीत्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या जीवंत सापाची 40 लाख रुपयांना विक्री करण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे तिघे वृद्ध दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून लुटत असत तसेच विविध ठिकाणी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी करणारी अट्टल टोळी माळशिरस पोलिसांनी जेरबंद केली आहे. सदाशिवनगर येथील पालखी मैदानावर शुक्रवारी तीन वाजता माळशिरस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे पेट्रोलिंग करत असताना बातमीदारांकडून पालखी मैदानावर तीनजण मांडूळ जातीच्या जीवंत सापाची 40 लाख रुपयांना विक्री करण्यासाठी येत असल्याबाबत माहिती मिळाली.
चोरी प्रकरणात माळशिरस तालुक्यातील जाधववाडी येथील घनश्याम रामचंद्र जाधव (वय 79) यांच्या घरी 15 सप्टेंबर 2020 रोजी मध्यरात्रीनंतर घरफोडी झाली होती. तपास करत असता सूरज दुर्योधन काळे (वय 27, रा. माळशिरस), सूरज कुंडलिक जाधव (वय 20, रा. जाधववाडी) यांनी वरील चोऱ्या केल्या आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सचिन हेंबाडे, समाधान शेंडगे, सोमनाथ माने, दत्तात्रय खरात व अमोल बकाल यांनी केली.