सोलापूर : पंढरपूर आगाराची बसक्रमांक एमएच 07 सी 9590 पंढरपूर-लातूर ही बस आपल्या प्रवासांना घेऊन पंढरपूर आगारातून सोलापूरकडे निघालेली होती. संपूर्ण प्रवाशांनी भरलेली बस पेनुरच्या पुढे आली. त्यानंतर अचानक पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला थांबली. बस का थांबली? म्हणून रस्त्याने जाणारे लोक बसजवळ थांबू लागले. तेव्हा बसमधील चालक -वाहक व प्रवाशी हे बसमधील बेशुद्ध प्रवाश्याला खाली उतरवत होते. बसमधील प्रवासी रामचंद्र काशिनाथ लिंगे (वय 44) हे अचानकपणे बेशुद्ध झाले. तेव्हा पेनुरच्या पुढे असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ बसमधील चालक व वाहक यांनी बस तात्काळ थांबवली. बेशुद्ध पडलेले लिंगे यांना बसमधून खाली उतरवले होते. सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी व नागरिकांनी 108 या क्रमांकावर रुग्णवाहिकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी साडेनऊला घडली.
बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावरच पडले : लिंगे हे बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावरच पडले होते. तेव्हा सर्वजण आपापल्या परीने त्यांना उपचारासाठी दवाखान्यासाठी तात्काळ कसे पोहोचवता येईल, यासाठी प्रयत्न करत होते. लिंगे यांची अत्यावस्था वाढतच चालली होती. तेव्हा त्यावेळी त्याच बसमधून करकंबचे उत्तम गायकवाड हे प्रवास करीत होते. त्यांनी संपूर्ण परिस्थिती पाहिली असता गायकवाड यांनी तात्काळ जवळ असणाऱ्या हॉटेलमधून एक कांदा आणला. तो कांदा फोडून रामचंद्र लिंगे यांच्या नाकावरती काही सेकंद धरला. त्यानंतर तात्काळ रामचंद्र हे शुद्धीवरती लिंगे आले. हे पाहून सर्व प्रवाशांनी चालक वाहक यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी व नागरिकांकडून कौतुक : याबाबत गायकवाड यांना अधिक माहिती विचारली असता गायकवाड म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये अनेक आयुर्वेदिक उपाय आहेत. त्या आयुर्वेदिक उपचारामुळे अनेक आजारांना बरे करता येऊ शकते. जर अचानकपणे अशी कुणाला फिट आली, तर पांढरा कांदा किंवा कातड्याची चप्पल याचा वास सदर रुग्णाच्या नाकावर धरावा. म्हणजे तो रुग्ण शुद्धीवर येतो, असेही गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी व नागरिकांकडून कौतुक होत आहे. उत्तम गायकवाड हे एक जेष्ठ नागरिक आहेत. आज त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्या सहप्रवासी मित्राचे प्राण वाचवले. उत्तम गायकवाड यांच्या प्रसंगावधानामुळे आज एक मोठा अनर्थ टळला आहे.