सोलापूर - यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांऐवजी शासकीय अधिकाऱ्यांना विठ्ठलाची महापूजा करण्याची शासकीय परवानगी देण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे. तसेच वारकरी संप्रदाय येणाऱ्या पदवीधर निवडणूकीत व राज्यातील इतर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कार्तिकी वारी समन्वय समितीच्या राणा महाराज वासकर महाराज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
निवडणुकीवर बहिष्कार
कार्तिकी वारीला निर्बंध लावल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या वतीने येणाऱ्या पदवीधर व अन्य निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कार्तिकी वारी समन्वय समितीच्या वतीने कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरूपाची होणार असल्यामुळे वारकरी संप्रदाय नाराज आहे. ज्याप्रमाणे वारकऱ्यांना कार्तिकी वारीसाठी बंदी घालण्यात आली आहे, त्याचप्रमाणे प्रशासनाकडून राज्य शासनालाही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून वारकरी संप्रदाय कार्तिकी वारी संदर्भात विविध पक्षांतील नेत्यांची भेट घेऊन वारीत कोणत्या प्रकारचा अडथळा आणू नये अशी मागणी केली होती.
हेही वाचा - गुजरातमध्ये कार आणि डंपरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जळून मृत्यू
राज्य सरकारकडे कार्तिकी वारी समन्वयककडून कार्तिकी वारी संबंधात प्रस्ताव देण्यात आला होता. यात प्रत्येक मठात पन्नास वारकऱ्यांना राहण्याची व भजन व कीर्तन करण्याची परवानगी मिळावी, कार्तिकी वारी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांना प्रदिक्षणा करण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या मांडल्या होत्या. कार्तिकी एकादशीनंतर राज्यात पदवीधर व शिक्षक निवडणुक होणार आहे. त्यावेळी वारकरी संप्रदाय राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, अशी जनजागृती लोकशाही मार्गाने करणार आहे. प्रत्येक ठिकाणी भजन व कीर्तनाद्वारे जनजागृती करणार आहे. त्याचबरोबर राज्यात इथून पुढे होणाऱ्या निवडणुकीत वारकरी संप्रदाय बहिष्कार टाकणार आहे. राज्य सरकारने वारीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती वारकरी पाईक संघाचे राणा महाराज वासकर यांनी केली आहे
कधी आहे एकादशी?
यंदा 25 नोव्हेंबरला प्रबोधिनी स्मार्त एकादशी आहे. तर 26 नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे. वारकरी सांप्रदायात भागवत एकादशीला विशेष महत्त्व असल्याने कार्तिकी एकादशीचा पंढरपुरासह राज्यात सर्वत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला साजरी होणार आहे. 25 नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील 5 ते 10 किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे. कार्तिकी यात्रा काळातही आषाढीप्रमाणे संचारबंदी लागू होणार असून 4 दिवस एसटी बससेवा देखील बंद राहणार आहे.
हेही वाचा - अर्जून रामपालचा मित्र आणि विदेशी नागरिक पॉल बार्टरला एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर