पंढरपूर(सोलापूर)- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्या उपाययोजना राबविणाऱ्या कोरोना योद्ध्यांनाही या विषाणूच्या संर्सगाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले असून अनेक कोरोना योद्ध्यांनी आपला जीवही गमावला आहे. त्याच प्रमाणे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. शौकतअली मोहिद्दीन शेख (वय ५७) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. शेख हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात कार्यरत होते.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत. सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. याआधी पंढरपूर येथील पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
राज्यात कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा हा 20 हजार 954 इतका आहे. यात 2 हजार 295 पोलीस अधिकारी, तर 18 हजार 659 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात आतापर्यंत 3 हजार 721 कोरोनाबाधित पोलीस हे उपचार घेत असून, यात 472 पोलीस अधिकारी तर 3259 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 17 हजार 6 पोलीस हे कोरोनातून उपचार घेऊन बरे झाले असून, यामध्ये 1801 पोलीस अधिकारी तर 15205 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच 'कोरोना'शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.