सोलापूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच सोलापुरात अॅक्टिव्ह कोरोना रूग्णसंख्या 10 हजाराच्या खाली आली आहे. सद्यस्थितीत शहरात 575 तर ग्रामीण भागात 8 हजार 318 रूग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी (28 मे) सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने 843, तर शहरात 30 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ग्रामीणमधील 2 हजार 25, तर शहरातील 43 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रूग्णसंख्या काल शहरात आढळली आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 मृत्यू
ग्रामीणमधील 22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शहरातील 3 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. सोलापुरात एकूण 25 मृत्यूमुळे स्थानिक प्रशासनाची चिंता कायम आहे. शहर-जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या 1 लाख 49 हजार 565 झाली आहे. त्यातील 3 हजार 904 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1 लाख 36 हजार 768 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सोलापूर ग्रामीण अहवाल
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी 8 हजार 409 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 814 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील रुग्णवाढ कमी झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र चिंता कायम आहे.
तालुक्यांची आकडेवारी
शुक्रवारी अक्कलकोट तालुक्यात 24, मंगळवेढ्यात 35 रूग्ण वाढले आहेत. बार्शीत 140, माढ्यात 177, माळशिरसमध्ये 191 रूग्ण वाढले. या तालुक्यात प्रत्येकी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच करमाळ्यात 41 रूग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापुरात 12 तर दक्षिण सोलापुरात 26 रूग्ण वाढले असून दोन्ही तालुक्यात प्रत्येकी तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मोहोळ तालुक्यात 40 रूग्ण वाढले असून चौघांचा तर पंढरपूर तालुक्यात 100 रूग्ण वाढले आहेत. पंढरपूर येथे 5 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहर अहवाल
सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने काल 1975 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 30 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण (30 रुग्ण) आढळले आहेत. शहरातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे.
हेही वाचा - पुण्यातील विकेंड लॉकडाऊन रद्द; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा