सोलापूर - शहरी भागात 126 तर ग्रामीण भागात 25 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच शहरात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसचं ग्रामीण भागामध्ये एका मृत्यूची नोंद आहे. सोलापूर शहरात आजपर्यंत एकूण 2 हजार 814 रुग्ण आढळले आहेत. सोलापूर शहर व ग्रामीण भाग मिळून 3 हजार 374 रुग्ण कोरोना महामारीच्या विळख्यात अडकले आहेत. मृतांचा आकडा पाहिला असता शहर व ग्रामीण भागात कोरोनामुळे 303 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी शहरात 261 अहवाल प्राप्त झाले त्यामधील 135 अहवाल निगेटिव्ह आले तर 126 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 78 पुरुष तर 48 महिला आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागात 25 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 19 पुरुष तर 6 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. मोहोळ येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात एकूण 557 रुग्ण कोरोना आजाराने ग्रस्त आहेत. तर एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरातील परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात असून, एकीकडे लॉकडाऊनची गरज भासू लागली आहे. तर दुसरीकडे काही समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी लॉकडाऊनचा विरोध करू लागले आहेत. कोरोना महामारीने सोलापूर शहरात उच्छाद मांडला आहे. पालकमंत्री भरणे यांनी यापूर्वीच कडक संचारबंदी बाबत खुलासा करत सांगितले होते की, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यासोबत चर्चा करूनच लॉकडाऊन घोषित केले जाणार आहे.