सोलापूर - मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडणे हे नक्कीच दिवा स्वप्न नाही. राजकारणातील ताकदीने ते हस्तगत करणे हे माझे स्वप्न असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी 'आपल्याला काम करत असताना एक ताकद मिळावी, मंत्री म्हणून ती ताकद मोठी असतेच. मात्र, मुख्यमंत्री म्हणून ती ताकद अधिक मोठी असते. तसेच त्यामाध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देता, यावी हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळेच जयंत पाटलांच्या डोक्यात मुख्यमंत्री पद असेल. मात्र, हे त्यांचे फक्त एक वक्तव्य असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी यावेळी दिली. ते सोलापूर दौऱ्यावर असताना बोलत होते.
जयंत पाटील काय म्हणाले होते-
सांगली मध्ये असताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. गेली वीस वर्षे राजकारणातील सक्रिय सहभाग असल्याने मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच दिवा स्वप्न नाही. राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणे आपला उद्दिष्ट असल्याचे पाटील म्हणाले होते.
जयंत पाटलांसारखे अनेक मोठे नेते आहेत-
जयंत पाटलांच्या या स्वप्नावर बोलतानाच आमदार रोहित पवार यांनी राज्यामध्ये जयंत पाटलांसारखे अनेक मोठे नेते आहेत. ज्यांच काम समाजात चांगले आहे, असे म्हणत राष्ट्रवादीत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेक उमेदवार असल्याचे अप्रत्यक्ष सांगून टाकले. दरम्यान राष्ट्रवादीचे राष्टीय अध्यक्ष शरद पवार याबाबत निर्णय घेतील, असेही रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
सोलापूर विद्यापीठातील गुणवाढ घोटाळा म्हणजे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये नुकताच एक गैरप्रकार समोर आला आहे. परीक्षा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संगनमत करून बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिके मध्ये गैरप्रकार केला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक देखील केली आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी गुणपत्रिकामंध्ये झालेला गैरप्रकार हा हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया दिली.