सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा तिढा अखेर सुटलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सायंकाळी ४ वाजता बारामतीतील गोविंद बागेत संजय शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
संजय शिंदे सोलापूर जिल्हा परिषदेचे भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असताना देखील संजय शिंदे यांनी भाजपला सोबत घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविल्यामुळे ते संपूर्ण राज्यभर चर्चेत आले होते तसेच सोलापूर जिल्ह्यात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता. सध्या संजय शिंदे हे भाजपच्या सोबत असले तरीही ही भाजपमध्ये गेले नव्हते. गेल्या ४ वर्षापासून संजय शिंदे यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र ते भाजपमध्ये गेले नाहीत. माढा लोकसभा मतदारसंघातूनही भाजपने संजय शिंदे यांना उमेदवारी देऊ केली होती, मात्र संजय शिंदे यांनी भाजपची उमेदवारी नाकारत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्यातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. संजय शिंदे हे सध्या राष्ट्रवादीमध्ये नाहीत त्यामुळे आज सायंकाळी चार वाजता संजय शिंदे त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी संजय शिंदे यांच्या नावाची माढा लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषणा होणार आहे.
संजय शिंदे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत न जमल्यामुळे गेल्या ४ वर्षापासून संजय शिंदे हे भाजपच्या सोबत होते. संजय शिंदे हे प्रत्यक्षात भाजपमध्ये गेले नसले तरीही भाजपला हाताशी धरत सोलापूर जिल्ह्यात तिसरी आघाडी स्थापन केली आणि यातूनच अपक्ष असलेल्या संजय शिंदे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले आहे.