सोलापूर - विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील लढतीकडे होते. आघाडी मुक्त पश्चिम महाराष्ट्र करण्यासाठी युतीच्या नेत्यांनी चंग बाधला होता. त्याच प्रमाणे पंढरपुरातही युतीने हा मतदारसंघ आपल्या बाजूने खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र राजकारणाच्या या आखाड्यात राजकारणातील पैलवान म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांनी भाजपचे उमेदवार परिचारक यांना पराभवाचे आस्मान दाखवले. एवढेच नाही तर विजयाची हॅट्रिक साधत शरद पवार साहेबांचा पठ्या म्हणून बिरूद मिळवले.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लढत चौरंगी आणि चुरशीची झाली होती. या लढतीत पक्षांतराच्या लाटेवर स्वार होत भाजपच्या गोठाचे दार ठोठावून राष्ट्रवादीत दाखल झालेले सरकोलीचे पैलवान भारत भालके हे तब्बल 13 हजार 568 मतांनी विजयी झाले. त्यांना एकूण 89,787 मते मिळाली. तर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे रयत क्रांतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना 75623 मते मिळाली. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले मंगळवेढ्याचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी 53 हजार 648 मते घेत निवडणुकीत रंगत भरली. तर काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळुंगे यांनी ७ हजार २३२ मते मिळवली.
पुतण्या पेक्षा चुलत्याला जास्त मताने पाडायचा विक्रम मतदारांनी केलाय..
भारत भालके यांनी २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रशांत परिचारक यांचा तब्बल 8 हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी त्यांनी त्यांचे काका आणि विरोधी उमेदवार सुधाकर परिचारक यांचा १३ मतांना दारूण पराभव केला. या विजयावर प्रतिक्रिया देताना भालके म्हणाले की, पवारांचा पठ्ठ्या विजयी झाला आहे. सर्व सामान्य जनतेने एका शेतकऱ्याच्या पोराला कोणत्याही आमिषाला बळी न पडता विजयी केले आहे. तसेच पुतण्या पेक्षा चुलत्याला जास्त मताने पाडायचा विक्रम मतदारांनी केलाय, असा टोला त्यांनी परिचारकांना लगावला. शिवाय आवताडेंनी या विजयात मोठी मदत केली असल्याचाही उपरोधिक टोला त्यांनी यावेळी लगावला.
या निवडणुकीच्या प्रचारात कमी शिकलेला उमेदवार म्हणून विरोधकांकडून भालकेंविरोधात अपप्रचार केला जात होता. मात्र, कमी शिकलेला उमेदवारही जनतेच्या मनात जागा निर्माण करू शकतो, हे भालकेंनी विरोधकांना दाखवून दिले. निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या भालकेंना प्रवेश मिळणार नसल्याचे दिसताच मुत्सदेगिरीने राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढे उमेदवारी मिळवून त्यांनी जोरदार प्रचारही सुरू केला. मंगळवेढ्या तालुक्यात आवताडे गटाचा फटका त्यांना बसणार होता. मात्र, वेळोवेळी विधानसभेत ३५ गावांच्या पाणी प्रश्नांचा केलेला पाठपुरावा, इतर विकासाच्या मुद्द्यावरून मतं मिळविण्यात ते यशस्वी ठरले. तसेच पंढरपुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: सभा घेऊन मतदारांना राष्ट्रवादीला मत देण्याचे आव्हान केले. मुळातच येथील शेतकरी मतदार शरद पवारांना मानणारा आहे. त्याचा फायदाही भालकेंना झाला.
मराठा कार्ड, आणि पवारांना मानणारा वर्ग -
मराठा आरक्षण आंदोलनावेळी भारत भालकेंनी मराठा समाजाच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला येण्यासही विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेचा त्यांना निश्चितच फायदा झाला. तसेच सकल मराठा समाजाने राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचा या ठिकाणी फायदा झाला आहे.