सोलापूर - पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावर माऊलींच्या पालखीसोबत 'रोजगार दिंडी' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 'रोजगार रथ' तयार करण्यात आला असून, एलईडी स्क्रीनवरून वारकऱ्यांना या उपक्रमाची माहिती दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रातील बेरोजगार पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाची' स्थापना करण्यात आली आहे. दिनांक २८ जून ते १२ जुलैपर्यंत आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाच्यावतीने या रोजगार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. 'मीस कॉल द्या व नोकरीची संधी मिळवा' अशी अगदी सोपी पद्धत नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. बेरोजगार पदवीधरांनी मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन स्वत:ची नोंदणी महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाच्या वेब पोर्टलवर करायची आहे.
नोकरीची संधी मिळवून देणाऱ्या मेसेजमध्ये, ज्या कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे त्या कंपनीची माहिती, मुलाखतीचे ठिकाण, कंपनीचा पत्ता, मासिक पगार व आवश्यक फोन नंबर तसेच मुलाखत घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती पाठवली जाणार आहे. अशा पद्धतीचे मुलाखतीसाठीचे कॉल संबंधित बेरोजगार तरुण किंवा तरुणींच्या मोबाईलवर तोपर्यंत येतील जोपर्यंत त्याला किंवा तिला नोकरी लागत नाही. शिवाय कोणत्या कंपनीची नोकरी स्वीकारायची हा पर्याय उमेदवाराच्या हातात असणार आहे, असेही उमेश पाटील यांनी सांगितले.
अनेक ठिकाणी मुलाखती देऊनही नोकरी नाही लागली तर, 'महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाच्या' वतीने संबंधित उमेदवारांसाठी १५ दिवस ते ३ महिन्यांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला मात्र, १०० टक्के नोकरीची हमी दिली जाणार आहे.
या रोजगार दिंडीचे औपचारिक उद्घाटन होणार नसून ज्यावेळी प्रत्यक्ष पहिल्या १ हजार बेरोजगार तरुणांना नोकरी लागेल, त्याचवेळेस उद्धाटन करणार असल्याची माहिती उमेश पाटील यांनी दिली. एक औपचारीक कार्यक्रम घेऊन 'बेरोजगारमुक्त महाराष्ट्र' या चळवळीचा शुभारंभ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते करणार असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले.