सोलापूर - मॅनेजरचा खून करून हॉटेलमधील वस्ताद फरार झाला असल्याची घटना सोलापूर-तुळजापूर महामार्गवरील सौरभ हॉटेल येथे घडली. याबाबत आकाश मंडल (रा. कोलकाता पश्चिम बंगाल) याचा तपास सुरू आहे. तर कैलास अप्पाराव परबळकर (रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ सोलापुर) यांचा खून झाला आहे.
याबाबत हॉटेलचालकाने माहिती देताना सांगितले की, कैलास परबळकर यांचा खून करुन आरोपी वस्ताद आकाश मंडल (रा. पश्चिम बंगाल) पसार झाला आहे. पोलिसांनी आकाशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर-तुळजापूर रोडवरील हॉटेल सौरभमध्ये कैलास परबळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होते. 23 मार्चपासून लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद ठेवण्यात आले होते. वस्ताद आकाश हा त्याच ठिकाणी राहण्यास होता. दरम्यान, 13 जूनपासून हॉटेल व्यवसाय पार्सल सेवेसाठी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.
हॉटेलमधील जेवण विभाग बंदच ठेवून पार्सल सोय त्याठिकाणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे परबळकर हे त्याच ठिकाणी मुक्कामी असायचे. शनिवारी वस्ताद आकाश आणि परबळकर जेवण करुन हॉटेलमध्ये झोपले. रविवारी (ता. 12) सकाळी सफाई करण्यासाठी कर्मचारी आला असता त्याला दोघेही त्याठिकाणी दिसले नाहीत. त्यावेळी त्यांनी हॉटेल मालक राजू गुल्लापल्ली यांना फोनवरुन माहिती दिली. मॅनेजरची रूम उघडी आहे, आतमध्ये रक्त दिसत आहे. वस्ताद व मॅनेजर दोघेही नसल्याचे सफाई कर्मचाऱ्याने सांगितले.
घटनेची माहिती मिळताच हॉटेलमालक गुलापल्ली ताबडतोब हॉटेलच्या ठिकाणी आले. आजूबाजूला पाहणी केली असता, त्याठिकाणी एका खड्ड्यात कैलास परबळकर यांचा मृतदेह आढळला. हॉटेल चालकांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. सदर वस्तादविरोधात संशयित आरोपी म्हणून फिर्याद देऊन त्याचा शोध सुरू केला असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली.
घटनास्थळावरून वस्ताद चे पलायन..
आकाश मंडल हा गेल्या अनेक वर्षांपासून सौरभ हॉटल येथे कामास होता. तसेच त्याने त्याच्या रूममधील 35 हजार रुपयांची रोकड देखील लंपास केली आहे. ओळखपत्राची सर्व कागदपत्रे घेऊन त्याने घटनास्थळावरून पलायन केले आहे. त्यामुळे संशयाची सुई वस्तादवर आहे. आता वस्ताद आकाश मंडलला अटक झाल्यावरच खरी माहिती समोर येणार आहे.