सोलापूर - राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर उद्याच राजीनामा देतो, असे परखड मत भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना मांडले. मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूर येथून झाली. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी काय करता येईल, याचा आढावा घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे, त्यानंतर 28 मे रोजी आपली सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही यावेळी संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
फक्त महाराष्ट्र राज्यात शिवजयंती साजरी केली जात होती. पण मी खासदार होतो म्हणून दिल्लीत देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या शिवजयंतीला राष्ट्रपती, लष्करप्रमुख आदींची उपस्थिती होती. राष्ट्रपती भवनात छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र लावण्यात आले. हे सर्व कार्य मी खासदार असल्याने झाले, असं देखील यावेळी संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
'देशातील दहा किल्ल्यांचे संवर्धन'
देशातील दहा किल्ल्यांचे संवर्धन होणार आहे. या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम केंद्र सरकार करणार आहे. या दहा किल्ल्यांमध्ये सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. हे काम कशामुळे झाले तर मी खासदार असल्यामुळे झाले. जर मराठा समाजाला माझ्या राजीनाम्यामुळेच आरक्षण मिळणार असेत तर मी उद्या राजीनामा देतो, असं देखील पत्रकार परिषदेत संभारीराजे भोसले यांनी म्हटले आहे.
'28 तारखेनंतर मराठा आरक्षणावर भूमिका मांडणार'
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे. कोल्हापूर येथून दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज सोमवारी 24 मे रोजी सायंकाळी भाजपा खासदार संभाजीराजे भोसले हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि 27 मे पर्यंत राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती दिली. तसेच 28 मे नंतर मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते आणि इतर मंत्र्यांसोबत बैठक घेऊन आरक्षणाबाबत मत व्यक्त करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - त्रिपुरा : आता बांबूच्या पानांचा चहा प्या; नैसर्गिक चवीसोबत आरोग्याचंही रक्षण