सोलापूर - सोलापूरचे नवनिर्नाचित खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यापुढे कधीही सिंहासनावर बसणार नसल्याचे वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. एका कार्यक्रमावेळी खासदारांना बसण्यासाठी सिंहासन ठेवण्यात आले होते. तर सहकारमंत्र्यांना बसण्यासाठी साधी खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र, खासदारांनी सिंहासनावर बसण्यास नकार दिला. त्यावेळी सुभाष देशमुखांनी त्यांना यावेळी सिंहासनावर बसा, यापुढे कुठेही सिंहासन ठेवण्यात येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर खासदार सिंहासनावर बसले.
खासदारांच्या पाद्यपूजेन विकासकांमाचा शुभारंभ-
सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची पाद्यपूजा करून विकासकामांना सुरुवात करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल संगम या ऐतिहासिक गावातील संगमेश्वर मंदिराच्या परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ खासदारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.
भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासाठी व्यासपीठावर सिंहासन ठेवण्यात आले होते. राज्याचे सहकार मंत्री हे साध्या खुर्चीवर आणि खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासाठी सिंहासन पाहून स्वतः खासदारांनी सिंहासनावर बसण्यास नकार दिला. यावेळी खासदारांनी साधी खुर्ची द्या, असे सांगितले. मात्र, त्यांच्या भक्तांनी यावेळेस स्वामींनी सिंहासनावर बसावे असा आग्रह केला. तरीही खासदार सिंहासनावर बसत नव्हते, यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळेस या आसनावर बसा, यापुढे कुठेही सिंहासन ठेवण्यात येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर महास्वामी सिंहासनावर बसले.
महास्वामी हे खासदार झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम होत असल्यामुळे त्यांच्या भक्तांनी त्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नवनिर्वाचित खासदारांनी दुष्काळी परिस्थिती असल्याचे सांगत त्यांच्या भक्तांचा आणि मतदारांचा भव्य सत्कार नाकारला. त्यामुळे गावकऱ्यांनी महाराजांच्या सत्कार म्हणून ३०३ वह्या आणि पेन भेट दिल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे ३०३ खासदार निवडून आल्यामुळे स्वामींना ३०३ वह्या भेट देण्यात आल्या.
नेहमीच धार्मिक प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या भक्तांसमोर व्यक्त होणाऱ्या महास्वामींनी आज प्रथमच खासदार म्हणून व्यासपीठावरून चौफेर फटकेबाजी केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे खासदारांनी कन्नड मधूनच खुमासदार भाषण केले.
येत्या काळात मंदिराचाही विकास करणार- देशमुख
येत्या काळात जिल्ह्याचा आणि मंदिराचा विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी ही महास्वामीवरच राहणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्याला येत्या काळात अध्यात्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येईल असेही देशमुख म्हणाले. तर राज्यात येणारे सरकार हेदेखील भाजपचेच असणार आहे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे खासदार जय सिद्धेश्वर यांनी सांगितले.