सोलापूर - पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी कोरोना वार्डात जाऊन कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस केली. जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती घ्यावी, त्यांच्यावर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या. पालकमंत्री यांच्या सोबत जिल्ह्यातील पदाधिकारी देखील उपस्थित होते.
कोरोनाच्या प्रार्दुभावावर विचार करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीशी चर्चा केली. या बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागहात ही बैठक झाली. या बैठकीस खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, भारत भालके, शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत, संजयमामा शिंदे, यशवंत माने, प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आदी उपस्थित होते. याबैठकीत सर्व खासदार, आमदार यांनी आपल्या समस्या सूचना मांडल्या.
आमदार भारत भालके यांनी हमीभाव केंद्र सुरू करा. उजनी धरणातून नदीत पाणी सोडा, अशी मागणी केली. आमदार राजेंद्र राऊत यांनी वैद्यकीय साधन सामग्री तत्काळ मिळावी, अशी मागणी केली. आमदार सुभाष देशमुख यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वच्छता करण्याची मागणी केली. आमदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील खासगी दवाखान्यात कोव्हिड पेशंटवर उपचार करण्याची मागणी केली.
वैद्यकीय साधन सामग्री तत्काळ खरेदी करून संबंधित तालुक्यात दिली जावी, अशा सूचना भरणे यांनी दिल्या. प्रत्येक आमदारांनी आप-आपल्या तालुक्याची आणि महापौरांनी शहराची काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले.
प्रत्येक तालुक्यात थर्मल स्कॅनर आणि पल्स औक्सिमीटर घेण्यात यावे. संशयित रुग्ण आढळल्यास त्याची कसून तिथेच तपासणी करण्यात यावी. त्यावर लगेच आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.