सोलापूर - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील उपळाई(बुद्रुक)गावात रविवारी सोशल डिस्टन्सिंग पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने घरातच विवाहसोहळा पार पडला. यावेळी, शुभेच्छुक व मित्र परिवाराने व्हिडिओ कॉलदारे नवदाम्पत्यास शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले.
लांबोटी तालुका मोहोळ येथील प्रभाकर चंदनशिवे यांचा मुलगा दिपक तर उपळाई (बुद्रुक) गावातील अनिल शिंदे यांची कन्या रजनी यांचा रविवारी विवाहसोळा पार पडला. या नवदामपत्याने तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन अभिवादन केले. वर दिपक व वधु रंजनी यांचा २४ मे रोजी लांबोटी येथे लग्न आयोजित करण्यात आले होते. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रकोपाने देशभरात लॉकडाऊन झाले. अशा परिस्थितीत प्रशासनाने सर्व कार्यक्रम रद्द केले.
याप्रसंगी चंदनशिवे आणि शिंदे या दोन्ही कुटुंबियांनी रविवारी सकाळी लग्नाबाबत चर्चा केली आणि दोन्ही परिवाराने लग्न घरातच करण्याचा निर्णय घेतला. लागलीच अत्यंत साध्या पद्धतीने घरातच गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने हा विवाहसोहळा पार पडला. वर-वधूच्या आई वडिलांसह नाते वाईकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाल्याचे कळल्यानंतर आप्त स्वकिंयानी व्हिडिओ कॉलद्वारे वधू-वराला आशीर्वाद दिले.