पंढरपूर (सोलापूर)- मराठा आरक्षणासाठी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी आक्रोश मोर्चाची सुरुवात शनिवारी (दि. 7 नोव्हेंबर) पंढरपूर येथील नामदेव पायरी येथून होणार होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी 6 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपासून 7 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपुरात संचार बंदीचे आंदेश दिले आहे. यामुळे आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्या आदेशाची होळी करण्यात आली. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज पंढरपुरातील शिवाजी चौकात राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संचार बंदी विरोधात नाराजी व्यक्त केली.
आंदोलनला विरोध करणाऱ्या सरकारने मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा आरक्षणासह इतर मागण्या मान्य कराव्यात, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय हा आक्रोश मोर्चा रद्द करण्याचा विचार करण्यात येईल. मात्र, सरकारकडून पोलीस बळाचा वापर करून दडपशाहीचा अवलंब केल्यास आणि मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय न घेतल्यास पंढरपुरातून आक्रोश मोर्चा निघणारच, असा ठाम निश्चय केला आहे.
5 जणांनाच पंढरपुरात आंदोलनाची परवानगी-
मराठा समाजाच्या वतीने या मोर्चासंदर्भात गुरुवारी माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 6 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून पंढरपुरात संचारबंदीचे आदेश लागू केले. तसेच विभागीय कार्यालयात तातडीची बैठक घेऊन आंदोलन स्थगित करण्याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना विनंती केली. तसे नाही केल्यास केवळ 5 जणांना पंढरपूर शहरात येऊन आंदोलनाची परवानगी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र मराठा क्रांती मोर्चच्या समन्वयक 50 जणांची परवानगी देण्याची मागणी केली. यावर पोलिसांनी ही मागणी फेटाळली आहे.
मराठा समाज अधिकच आक्रमक होण्याची चिन्हे -
पंढरपूर येथे पोलीस प्रशासन व मराठा क्रांती समन्वयक यांच्यात झालेल्या बैठकीत पंढरपूर येथे निघणाऱ्या आक्रोश मोर्चा बाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी अंतिम निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे.
एसटी सेवा बंद राहणार-
पंढरपूर येथे 6 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. या संचारबंदीच्या काळात एसटी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. पंढरपुरात नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, प्रदक्षणा मार्ग ते चौफाळा या भागात मोठा पोलीस बंदोबस्त असण्याची शक्यता आहे.