हैदराबाद - महाराष्ट्राच्या कन्या वरीष्ठ आयपीएस अधिकारी विद्या कुलकर्णी यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या सहसंचालकपदी (CBI Joint Director) नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या तामिळनाडू राज्यात दक्षता आणि अॅन्टी करप्शन विभागाच्या प्रमुख आहेत. (ACB Chief Tamilnadu) त्या 1998च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांची सहसंचालकपदी निवड -
विद्या कुलकर्णी महाराष्ट्राच्या कन्या असून सध्या त्या आपल्या राज्याचं नाव दक्षिणेतील तामिळनाडू या राज्यात गाजवत आहेत. सोलापूर जिल्ह्यातून आपलं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्या कुलकर्णी तामिळनाडू राज्यात दक्षता आणि अॅन्टी करप्शन विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी विविध महत्वाची पदे सांभाळली आहेत. पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची सीबीआयच्या सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्या कुलकर्णी यांच्यासोबत वरिष्ठ आयपीएस घनश्याम उपाध्याय आणि नवल बजाज यांचीही सीबीआयचे सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्या कुलकर्णी यांच्याबद्दल...
त्यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यानंतर सांगली येथून त्यांनी बीईची डिग्री घेतली. बीईच्या डिग्रीनंतर पुणे विद्यापीठातून सोशल स्टडीज या विषयात पोस्ट ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. त्यानंतर पुण्यामध्ये यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांचे वडिल बँकेत होते. त्यांना वाचनाची तसेच पोलीस गणवेशाची आवड होती. आधीपासूनचं त्यांना आयपीएस होण्याची इच्छा होती. क्राईम हे क्षेत्र माझ्या आवडीचं आहे. त्यामुळे ग्रॅज्यूएशन झाल्यानंतर मी यूपीएससी परिक्षेची तयारी करण्याचं ठरवलं. मग मी पुण्यात अभ्यास केला. माझ्या कुटुंबाने यासाठी मला पूर्ण सहकार्य केलं आणि मी माझं ध्येय गाठलं, असं ईटीव्ही भारतने घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. याचवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला होता.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महिलांनी आवडीच्या क्षेत्रात करियर करावे; तामिळनाडूच्या एसीबी प्रमुख विद्या कुलकर्णी