सोलापूर - सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच पाय पसरले आहेत. शहर व जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात प्रशासनाने तत्काळ पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात कोरोना ग्रस्तांसाठी हॉस्पिटलची कमतरता पडू नये, यासाठी लोकमंगल समुहाने त्याचे जीवक हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने हे सहकारी हॉस्पिटल चालविले जाते. सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये जागा कमी पडत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना व्हावी यासाठी लोकमंगल जीवक हॉस्पिटल कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय आम्ही हॉस्पिटल प्रशासनाच्या माध्यमातून घेतला असल्याचे देशमुख म्हणाले.
या कसोटीच्या काळात शासन, प्रशासनाला शक्य ती सर्व मदत करण्याचा माझा व लोकमंगल परिवाराचा प्रयत्न आहे. लोकमंगल हॉस्पिटलमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत त्यांना सर्वतोपरी सहकार्य व्हावे, यासाठी माझ्यासह हॉस्पिटलची संपूर्ण टीम पूर्णपणे कार्यरत राहणार आहे. लोकमंगल जीवक हॉस्पीटलने पुढाकार घेऊन हे हॉस्पिटल उपलब्ध करून दिल्यामुळे सोलापूर महापालिका आयूक्त यांनी हॉस्पिटलच्या संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.