सोलापूर - केंद्र सरकारने मदत पाठवल्यास मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याचा अर्थ केंद्राने मदत केली नाही, तर राज्य सरकार काहीही करणार नाही का, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला. सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संताप व्यक्त करत 'सरकार पंचनाम्याने नाटक करत आहे', असे ते म्हणाले. तसेच तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी दरेकरांनी केली.
हातात आलेले पीक वाहून गेल्याने त्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त बळीराजाला कोरडवाहूला हेक्टरी 25 हजार व बागायतीला हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्याची पूर्तता करावी, असे दरेकर म्हणाले.
मात्र सध्या राज्य सरकार दिशाभूल करण्याचे काम करत आहे. राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री, बिहार आणि मुंबई पोलीस असा वाद उभा करून मूळ विषयाला फाटा फोडण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. अन्नदात्यासाठी कर्ज काढून मदत करायला काय अडचण आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अन्यथा शेतकरी तुम्हाला जागा दाखवेल!
केंद्र सरकार तर मदत करेलच, पण तुम्ही तातडीची मदत द्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. राज्य सरकार पंचनामे केल्याशिवाय मदत करत नाही. तर मग केंद्र सरकारकडे का तत्काळ मदत मागताय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंचनामे तातडीने करा म्हणताय, आणि दुसरीकडे मात्र 10 टक्केही पंचनामे झालेले नाहीत. लवकर मदत करा, अन्यथा शेतकरी तुम्हाला जागा दाखवेल, असा इशाराही दरेकरांनी दिला आहे.
भारतीय जनता पार्टी टोकाची भूमिका घेईल
बळीराजाला भूक लागली आहे. त्यांना तत्काळ मदत करा. अन्यथा विरोधक म्हणून आम्ही बळीराजाला सोबत घेऊन टोकाची भूमिका घेऊ, असा इशारा दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. अक्कलकोट दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तीन हजार 800 रुपयांची मदत दिली. अशी मदत करण्यापेक्षा मदत देऊ नका, असे दरेकर म्हणाले. शेतकरी जागाचा पोशिंदा आहे. त्याची थट्टा करू नका असेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत खासदार डॉ.जय सिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.