सोलापूर - दिवसेंदिवस सोलापूर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. अनेक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर काही रुग्ण विलगिकरण कक्षात उपचार घेत आहेत. आज (गुरुवार) सकाळी विलगीकरण कक्षात अतिशय निकृष्ठ दर्जाचा नाश्ता देण्यात आला होता. नाश्त्यामधील पोह्यांमध्ये जिवंत अळ्या निघाल्याने रुग्णांमध्ये व विलगीकरण कक्षात एकच खळबळ उडाली.
कर्णिकनगर येथील वालचंद कॉलेजमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये सकाळी हा प्रकार घडला. लखन रमेश गायकवाड व अंकुश रमेश गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले, की महापालिका प्रशासनाने पोह्याचा नाश्ता दिला होता. त्यामध्ये जिवंत अळ्या आढळून आल्या.आमचं कुटुंब वालचंद कॉलेज येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत आहे. नाश्त्यामध्ये अळ्या निघाल्याने आम्ही मनपाच्या अधिकाऱ्यास याबद्दल जाब विचारला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
अन्नामध्ये जिवंत अळ्या निघाल्याने खाण्याची इच्छा मरून गेली आहे. तसेच येथे उपचार घेणाऱ्या नागरिकांनी आपली कैफियत मांडताना सांगितले, की वेळेवर स्वॅब घेत नाहीत. रिपोर्ट येण्यास उशीर होतो. जेवण निकृष्ठ दर्जाचे आहे. यावेळी क्वारंटाईन सेंटरमधील इतर रुग्णांनी नाश्ता परत दिला. हा अन्न पुरवठा पीडब्ल्यू विभागमार्फत केला जात आहे.