पंढरपूर : शहरातील एका खासगी दाताच्या दवाखान्यामध्ये दाढ काढताना 25 वर्षे महिलेचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा नातेवाईकांनी केला आहे. जयश्री नंदकुमार चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. सोलापूर येथे उपचारांसाठी घेऊन जात असताना या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मृतदेह पोलीस ठाण्यामध्ये नेला.
सोलापूर येथे मृत घोषित
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातून जयश्री चव्हाण या आपल्या पतीसह दाढ काढण्यासाठी पंढरपूर येथे दाताच्या दवाखान्यामध्ये आल्या होत्या. खासगी दवाखान्यातील दाताच्या डॉक्टरांनी जयश्री चव्हाण यांना दाढ काढताना भूल दिली होती. मात्र जयश्री चव्हाण यांना अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी पंढरपूर येथील एका मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र जयश्री चव्हाण यांची प्रकृती बिघडत असल्यामुळे त्यांना सोलापूर येथे हलवण्यास सांगितले. सोलापूरच्या दिशेने जात असताना जयश्री चव्हाण यांचा मृत्यू झाला. सोलापूर येथे गेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
नातेवाईक रुग्णवाहिकेसह पंढरपूर पोलीस ठाण्यात
पंढरपूर येथील खासगी रुग्णालयातील दाताच्या डॉक्टरांनी जयश्री चव्हाण यांना भूल देण्याची पद्धत चुकीची होती. चुकीच्या पद्धतीच्या उपचारामुळे जयश्री चव्हाण यांचा मृत्यू झाला, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर नातेवाईक रुग्णवाहिकेसह मृतदेह पंढरपूर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. नातेवाईकांनी संबंधीत डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तर, पंढरपूर शहर पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर जयश्री चव्हाण यांचा मृतदेह त्यांच्या गावी नेण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
हेही वाचा - पती, वारस नाही; माय-लेकीची नदीत उडी घेऊन आत्महत्या