सोलापूर- भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेती तसेच इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे जलसंधारण मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे सहपालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील शिरढोण, पिराची कुरोली तसेच पंढरपूर शहरामध्ये अंबाबाई पटांगण, आंबेडकर नगर या भागातील पूरग्रस्त नागरिकांना सावंत यांनी भेट दिली. या भागातील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांनी पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
पूरग्रस्त नागरिकांना सावंत यांच्या भैरवनाथ शुगर या साखर कारखानाच्या माध्यमातून चादर वाटप करण्यात आली. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच ज्यांची शेती नाही अशा नागरिकांनाही नुकसान भरपाई देण्यासाठी त्यांच्या मालमत्ता नुकसानीच्या नोंदी करण्याचे आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
राज्य शासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तरतुदीत भरीव वाढ केली आहे. पंचनामे होताच पूरग्रस्तांना तत्काळ मदत दिली जाईल, असे सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांची उपस्थिती होती.