सोलापूर People Struggle For Voting Right : देशानं स्वातंत्र्याची 75 वर्ष पार केली आहेत. मात्र अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील तांड्यावरील नागरिक ग्राम पंचायत मतदान यादीत नाव येण्यासाठी झगडत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा, म्हेत्रे तांडा एक आणि दोन या तांड्य़ावरील नागरिक अक्कलकोट तहसीलदार कार्यालयात मतदान यादीत नाव येण्यासाठी झगडत आहेत. मतदान यादीत नाव येत नसल्यानं लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होता येत नसल्याची खंत या नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडं मांडली आहे. सरकारनं मतदानाचा हक्क देऊन तांड्याचा विकास केला नाही, तर कर्नाटकात जाऊ, असा इशाराही या नागरिकांनी यावेळी दिला आहे.
तांड्यावरील नागरिकांचा तीन पिढ्यांपासून संघर्ष : "या तांड्यापासून सहा किलोमीटर लांब असलेल्या सिंनूर गावच्या ग्रामपंचायतीचे अधिकारी येतात, कर वसुली करतात. जन्म मृत्यूची नोंद करतात. मात्र मतदानाचा हक्क विचारला असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना विचारा, असं उत्तर देतात" असं या नागरिकांनी सांगितलं. शिवाजी नगर तांडा आणि म्हेत्रे तांडा इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली असता, जवळपास तीन हजार लोकसंख्या असलेलं छोटसं गाव समस्यांनी ग्रासलं आहे. अनेक धक्कादायक खुलासे ग्रामस्थांनी यावेळी केले आहेत. "तांड्यावर तीन पिढ्या झाल्या, आजतागायत ग्रामपंचायतीत लोकशाहीचा हक्क बजावला नाही. तांड्यावर ग्रामपंचायत नसल्यानं कोणताही विकास झाला नाही. आजही विहिरीत उतरुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते. कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही" अशा समस्या तांड्यावरील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
ग्राम पंचायत निवडणुकीत येत नाही नाव : "आमदार, खासदारकीच्या मतदान यादीत नागरिकांचं नाव येते मग, ग्रामपंचायतीच्या यादीत नाव का येत नाही ? भारत देश एकीकडं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो, दुसरीकडं मात्र आम्ही मतदानाचा हक्क मागत होतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली. आजही आम्ही ग्रामपंचायतीच्या मतदानापासून वंचित आहोत" अशी खंत तांड्यावरील ग्रामस्थांनी व्यक्त केली. "आमदार आणि खासदार निवडणुकीत मतदान यादीत नावं येते, मात्र कोणत्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हाला मतदान करायला मिळत नाही. कोणतीही ग्रामपंचायत आम्हाला समाविष्ट करुन घेत नसल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत लोकशाहीचा हक्क बजावण्याचा अधिकार आम्हाला आजतागायत प्रशासनानं दिला नाही. भाजपाचे स्थानिक आमदार सचिन कल्याणशेट्टी, काँग्रेसचे तत्कालीन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडं ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी करुन घ्या अशी मागणी केली होती, मात्र आजतागायत फक्त आश्वासनं मिळाली" अशी माहिती ग्रामस्थांनी सांगितली.
मतदार यादीत नाव आलं नाही, तर कर्नाटकात जाऊ : "कर्नाटक सीमेवर आहोत, महाराष्ट्र शासनानं विकास केला नाही, तर कर्नाटकात जाऊ. शिवाजी नगर तांडा, म्हेत्रे तांडा एक आणि म्हेत्रे तांडा दोन, दलित वस्ती अशा एकूण तीन तांड्यात आणि दलित वस्तीत लोकसंख्या जवळपास तीन हजार आहे. गेल्या वर्षी कर्नाटक महाराष्ट्र सीमेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पाच किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यातील विविध गावं आहेत. कर्नाटक सरकारनं सीमेलगत मोठा विकास केला आहे. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यातील सीमेवरील नागरिकांच्या लोकवस्तीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा देत नाही. सीमेवरील गावांकडं दुर्लक्ष करत समस्याचं निराकरण करत नाही. महाराष्ट्र शासनानं सीमेवर असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापन केली नाही. मतदार यादीत नाव समाविष्ट करुन घेतलं नाही, तर आम्ही कर्नाटकात जाऊ" असा इशारा देखील या तांड्यावरील भानुदास धनसिंग राठोड यांनी दिला आहे.
प्रशासनाचे मत काय - यासंदर्भात प्रशासनाला विचारलं असता अक्कलकोटचे तहसिलदार बाळासाहेब शिरसट म्हणाले की, 'शिवाजी नगर तांडा आणि म्हेत्रे तांडा येथील ग्रामस्थांची नावे मतदान यादीत का आली नाही याबाबत मला काही कल्पना नाही. जुन्या काळात काय झालं तो भाग वेगळा आहे. शिवाजी नगर तांडा म्हेत्रे तांडा क्रमांक 1 व 2 येथील ग्रामस्थांनी निवेदन दिलं आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. भविष्यात लवकर गांधी नगर तांडा येथील ग्रामपंचायतीच्या यादीत नावं समाविष्ट केली जातील.'
हेही वाचा :