सोलापूर - शहरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्याऐवजी १२ खाटांचा अतिदक्षता विभाग बंद ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे याची माहिती देखील प्रशासनापासून लपविण्यात आली होती. आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली असता हा प्रकार समोर आला आहे.
मार्कंडेय सहकारी हे शहरातील प्रमुख रुग्णालयापैकी एक आहे. या रुग्णालयातील काही खाटा कोरोनाच्या उपचारासाठी अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, या रुग्णालयाने जिल्हाधिकाऱ्यांना खोटी माहिती देत आमच्याकडे अतिदक्षता विभाग नसल्याचे सांगितले होते. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार न करता सुसज्ज असा 12 खाटांच्या अतिदक्षता विभागाला कुलूप लावून बंद ठेवण्यात आले होते. प्रशासनाने सांगून देखील या रुग्णालयात उपचार केले जात नव्हते. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना घरी पाठविले जात होते. या रुग्णालयासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या रुग्णालयाला अचनाक भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी पाहणी केली असता अतिदक्षता विभाग कुलूप लावून बंद केलेला दिसला. अतिदक्षता विभागाच्या बाहेर असलेली पाटी देखील काढून टाकण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी हा वार्ड उघडण्याचे सांगितल्यानंतर उडवा उडवीचे उत्तरे दिली जात होती.
वास्तविक पाहता रुग्णालयाने रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे. मात्र, मार्कंडेय सहकारी रुग्णालयाने सुसज्ज असा अतिदक्षता विभाग बंद ठेवून रुग्णसेवेला काळीमा फासण्याचे काम केले आहे. पालकमंत्र्यांनी याबद्दल विचारणा केली असता डॉक्टर उपचारासाठी येत नसल्याचे कारण रुग्णालयाकडून देण्यात आले. सर्व डॉक्टरांनी रुग्णालयात हजर राहून सेवा द्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. आदेशही काढले होते. मात्र, डॉक्टर सेवा देण्यासाठी येत नसल्याचे कारण रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. यावेळी सेवा देण्यासाठी न येणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत.