सोलापूर - पंढरपूर शहरातील विविध भागात तसेच तमाम वारकऱ्यांचे आद्यपीठ असलेल्या श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिराच्या वतीने पारंपरिक होलिकोत्सव साजरा करण्यात आला. वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्य वाजवून होलिकोत्सव आनंदात साजरा करण्यात आला.
पंढरपुरातील श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिराच्या समोरील नामदेव पायरी जवळ होळी सण साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांनी होळी पूजन करून होळी पेटविली. यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
मंदिरासमोर असलेल्या गोपाळकृष्ण मंदिरासमोर तसेच उत्तरद्वार, पश्चिमद्वार, दक्षिणद्वार या ठिकाणी देखील होळी पेटवून होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी होळीला प्रदक्षिणा घालून तिचे दर्शन घेऊन अनिष्ट रूढी परंपरा, दारिद्र्य, आळस यांचा नाश व्हावा, असा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच यावेळी बालगोपालांनी दिमडी वाजवून होळीचा आनंद साजरा केला.
वसंत ऋतूची चाहूल लागताच होळी हा सण साजरा केला जातो. होळीलाच अनेक भागात होलिका दहन असेही संबोधले जाते. माणसाच्या अंगी असलेले दूर्गुण या होळीत जाळून टाकावेत आणि चांगले आयुष्य जगावे यासाठी ही होळी साजरी केली जात असल्याचे मानले जाते. पंढरपूरातील श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिर समितीच्या वतीने देखील होळी साजरी करण्यात आली.