सोलापूर- विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला या काही भागांना झोडपून काढले. यात सांगोला तालुक्यातील चोपडी गावात वीज पडून शकुंतला बाबुराव खळगे यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चोपडी गावात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
राज्यात काही दिवस पावसाचा खंड पडला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले. तसेच, आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्थिती पुढील काही दिवस राहणार आहे.
काल (९ ऑक्टोबर) सायंकाळी पावसाने पंढरपूर तालुक्यात हजेरी लावली. सुरुवातीला हलका वाटणाऱ्या पावसाने काही मिनिटात उग्र रूप धारण केले. पावसामुळे डाळींब, लिंबू, सीताफळसह फळबाग, तर खरिपातील तूर, कपाशी, मका आणि ऊस पिके भुईसपाट झाली आहेत. पावसामुळे जवारीलाही फटका बसला आहे. दिवसभर उभे असलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दुखाचे वातावरण आहे.
पंढरपुर तालुक्यातील आजची पर्जन्यमान मंडळनिहाय माहिती..
करकंब ३९ मि.मी
पट कुरोली २९ मि.मी
भंडीशेगाव २७ मि.मी
भाळवणी ४६ मि.मी
कासेगाव २३ मि.मी
पंढरपूर ४ मि.मी
तुंगत ८ मि.मी
चळे ७ मि.मी
पुळूज ६ मि.मी
पंढरपूर तालुका सरासरी पाऊस- २१ मि.मी
हेही वाचा- महामार्ग पोलिसांनी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 75 लाखांचा दंड केला वसूल